दृष्य -1
गण्या झोपला आहे. त्याला स्वप्न पडले आहे. (स्वप्नात - ओसामा बिन लादेन आणि बराक ओबामा एकमेकांशी भांडताना दिसतात.)
गण्या स्वप्नातून खडबूडन जागा होतो. आळस काढतो.
दृष्य -2
दारूचा अड्डा दोघेजण दारू पित आहेत.
गण्या : अरे मी आज ओसामा बिन लादेन पाहिला. आपल्या गावात लपला आहे तो.
मन्या : अरे तुला चढलीय साल्या. बस कर आता !
गण्या : हात तुझ्या आयला ! अजून गलास तोंडाला पण लावले नाय. मी खरं सांगतोय ओसामा गावात आलाय आणि त्याला शोधायला ओबामा पण आला आहे.
मन्या : आसल आसल तु सांगतोयस तर मग आलाच आसल..
....
स्पॉट -1
पाणी भरणाऱ्या महिलांची चर्चा
पहिली : अग ऐकलस काय ? तुला माहितीय तो ओसामा की फोसामा आपल्या गावात लपलाय म्हणे.
दुसरी : अग बाई खरच. आमचे हे सुध्दा काल आसच काही तरी सांगत व्हते. डोंगऱ्यांच्या अड्यावर काल ओसामाचीच चर्चा व्हती. ओसामाच्या भीतीन काल संगळ्यांची जागच्या जागी उतरली म्हणे.
पहिली : मला तर बाई खूप भ्या वाटतय. मेला एकडं कुठ आला तडमडायला ऐवढ्या लांब.
दुसरी : बघ ना . हलकट मेला. आग पण तो ओबामा पण आलाय ना त्याच्या मागावर
पहिली : ओबामा हा आणि बामा कोण जळला ?
दुसरी : अग तो अमेरीकेचा राष्ट्राध्यक्ष नाय काय. काय मेल्याचं नाव चांगलच तोंडावर हाय....पण येत नाय बग.... हा आठवलं.... बराक ओबामा.
............
स्पॉट लाईट : 2
सुतारकाम सुरू आहे.दोघे जण रंधा मारताहेत.
पहिला : अरं गावाची पाचावरधारन बसली हाय लेकानू.
दुसरा : (काळजीच्या सुरात) का काय झालं. काय भानगड झाली काय ?
पहिला : लेका हायस कुठं. अरं एवढा मोठा दहशतवादी गावात घुसलाय आन् तूला खबर नाय. हात तुझ्या.
दुसरा : काय म्हनतोस दहशतवादी . बापरं ! मेलव आता आपून. अपणास पन तो घन मशीनच्या गोल्या घालणार आता.
पहिला : आरं नुसत्या घन मशीनच्या गोल्या नाय. तर इमानं पण पाडून घालतो तो घरावरनी
दुसरा : अरं पण तो लपलाय तरी खय
पहिला : कोण म्हणत व्हता . पात्रादेवीत पाहिला तर कोण म्हणे एक लांब दाढीवाला हातात काठी व खांद्यावर धनगरावानी शाल पांघरून घन मशीन लटकवलेला बाप्या बघिटला.
दुसरा : बाप रं ! तो- तो असोमा आसनार .काल गावावरनं दोन इमान पण घरघरत गेली व्हती आता आपलं काही खरं नाय.
स्पॉट -3
शाळेतील मुले
पहिला : बाईंनी सांगितलय गुमान सरळ घरला जायचं, इकडं तिकडं कुठं बी भटकायच नाय.
दुसरा : बाई म्हनल्या कोणी दाढीवाला माणूस दिसला तर त्याच्या जवल जायचं नाय.त्यानं काही दिलं तर खायच बी नाय.
पहिला : बाई म्हणत हूत्या दहशतवादी घुसलाय गावात. बाईंची पण जाम टरकली हाय.
......
दृष्य - 4
गावाची मिटींग बसते. ( रितसर सुरवात होते.)
अध्यक्ष : तर मंडळी गावात "ओसामा' आल्याची खबर हाये.
(मिटींगमध्ये महिला व पुरूषांमध्ये भिती युक्त कुजबुज होते)
अध्यक्ष : शांत रहा मंडळी. आपापासात चर्चा नको. आपल्या गावावर संकट आलय.ओसामा पासून आपल्या गावाला धोका होता नये.
एकजण : होय अध्यक्षानू बराबर हाय
अध्यक्ष : आपण गावांन ओसामाला धरायचं आणि त्याला शोधायला आलेल्या ओबामाला पण धरायचं. गावाच्या येशी बाहेर जाऊन काय ते एकमेकांच्या मानेवर बसा म्हणाव., आधी गळ्यात गळे घातले आणि आता एकमेकांच्या जीवावर उठलेत. आमच्या गावात खुन खराबा नको. ठरल तर दोघावांनाही गावानं धरायचं. तेव्हा सावध रहा . लांब रूंद जाऊ नका. दोघांची खबर कळताच आम्हसनी कळवा. ....................
दृष्य - 5
अंगणात दोघेजण गप्पा मारत असतात. तेवढ्यात घरातून हाक येते.ओसामा आणि ओबामा जेवायला चला. दोघे आलो म्हणत घरात जातात. ही हाक रस्त्याने जाणारा एक जण ऐकतो.
दृष्य : 6
गावकरी आणि पोलीसांनी घरातील ओसामा आणि ओबामाला पकडलं आहे. (दोघांचे लुक वेगळे आहे.)
पोलीस : ओसामाकडे पाहून काय रे ! दाढी केलेली दिसतेय . न्हावी भेटला वाटतं तुला
वेश पालटून राहतोस काय गावात. अरे जगाला गंडवलस तरी या रत्नागीरीचे पोलीस तुला सोडणार नाहीत. समजलास काय तु आम्हाला.
(पोलीस : ओबामाकडे वळून) आणि काय ओबामा साहेब . असाल अमेरीकेचे अध्यक्ष पण आपल्या एरीयात ना चालयची दादागीरी. आणि काय रे ओसामाला पकडायचे नाटक करतो आणि इंथ गळ्यातगळे घालता. लाज नाही वाटत.
(दोघे ही घाबरून ) साहेब आम्ही ते नाहीत.सोडा आम्हाला
पोलीस : काय रे येडा समजला काय .
पहिला : साहेब माझे खरं नाव ओबामा नाही. तो माझ्या नावाचा शॉटफॉम आहे.
पोलीस : ही काय नवी भानगड आता. सरळ बोला नाही तर फटकेच टाकतो तुम्हाला.
पहिला : साहेब माझे नाव ओमकार बाळकृष्ण मांजरेकर मला माझे सगळे मित्र "ओबामा' असे शॉर्टफॉम मध्ये हाक मारतात.
आणि साहेब मी पण ओसामा नाही. माझे नाव ओमकार सागर मालवणकर आहे. सारे माला शॉर्टफॉम मध्ये ओसामा हाक मारतात.आणि मी ओबामाचा सॉरी ओमकार मांजरेकरचा मित्र आहे. (सारे जण एकदम खळखळून हासतात.)
पोलीस : कपाळावर हात मारून घेतो
तेवढ्यात एक हवालदार धावत येतो... साहेब खरा ओसामा बिन लादेन आपल्या गावात नाही . तो पाकिस्तानातील एका गावात लपला होता. अमेरीकेनं मारला त्याला टीव्हीवर दाखवतायत बघा.
