वाचक

View My Stats

Thursday, August 20, 2009

न संपणारे प्रश्‍न...


प्रश्‍नाचे भेंडोळं माझ्या मनात खूप वाढू लागलं आहे. या भेंडोळ्यात मी गुरफटून तर जाणार नाही ना ?प्रश्‍न पडतात... पण त्याची उत्तरे मी कधी शोधणार ? की, उत्तरे आहेत माझ्याकडे पण मी ती पडताळून पाहत नाही ? पुन्हा नवा प्रश्‍न ! भर दरबारात द्रौपदीच वस्त्रहरण करणाऱ्या दुष्यासनासारखी माझी अवस्था होते. प्रश्‍नांचे भेंडोळं खेचून त्यातून उत्तराचे उघडे सत्य पाहण्याचा माझा प्रयत्न कधी तरी यशस्वी होईल का ? पुन्हा नवा प्रश्‍न. प्रश्‍न असेच न संपणारे, कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा अंत न लागणारे... कदाचित प्रश्‍नाच्या द्रौपदीला एखाद्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद असावा म्हणून ते संपता संपत नाहीत...

..............vp

Wednesday, August 19, 2009

स्वर्गाला झाला डुक्कर ताप !


(स्वर्गातील दृष्य)


भगवान विष्णू आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पहुडले आहेत. कालिया नाग त्यांच्या सेवेस तत्पर आहे. बातम्यांचा रतीब घालणाऱ्या न्यूज चॅनेल भगवान पाहत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. लक्ष्मीही कमालीची चिंतातूर झाली आहे. नुकताच भगवान शंकरांचा फोन येऊन गेला असून पार्वतीदेखील फोनवर चिडल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मीही घाबारलीय...


लक्ष्मी : भगवान आपण नारदांना फार लाडावून ठेवलेय. वाहतुकीच्या साधनात येवढी डेव्हल्पमेंट झाली तरी नारद हल्ली पृथ्वीवरून लवकर परत येत नाहीत.


(तेवढ्यात द्वारपाल येऊन नारदमुनी आल्याची खबर देतो. तोंडाला मास्क बांधलेले नारद घाईघाईत प्रवेश करतात.)


नारद : नारायण... नारायण... (भगवान विष्णू काहीच प्रतिसाद देत नाहीत.) नारायण... नारायण... देवा, काय झालं? आमच्यावर का रागावलात?


विष्णू : नारदा, हे तुझं नेहमीचंच झालं आहे. मागंही एकदा पृथ्वीवर गेलात ते असेच उशिरा परत आलात. आम्ही काय समजायच?


नारद : क्षमा असावी भगवान. पण उशिरा झाला त्याला कारणही तसंच आहे.


विष्णू : (चिडून) का, काय झालं आता ?नारद : पृथ्वीवर खबरबात घेण्यासाठी फिरत होतो. मुंबई आणि महाराष्ट्रात जाऊन आलो तर तेथे भयानक स्थिती आढळली. "डुक्कर ताप" ( स्वाईन फ्लू ) नावाच्या रोगानं उच्छाद मांडलाय नुसता...


विष्णू : ते आम्ही पाहतोच आहोत... चॅनेलवर...


नारद : भगवंत, आम्हालाही त्या स्वाईन फ्लूने सोडलं नाही. कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनच परततोय.


(नाकावर हात धरत लक्ष्मी आणि विष्णू घाबरून एकदम ओरडतात... "काय म्हणतोस नारदा..' )


नारद : घाबरू नका भगवंत, मी पूर्णपणे उपचार घेऊन आलोय. उपचारानं स्वाईन फ्लू अगदी बरा होतो.


विष्णू : (उसासा सोडून) ठीक आहे...


लक्ष्मी : (चिडून) काय ठिकाय आहे. सकाळी शंकर देवांचा फोन आलेला ते गणेशाला यंदा पृथ्वीवर पाठवायला तयार नाहीत. ते स्वाईन फ्लूची रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्याचं काय ?


विष्णू : अरे हो विसरलोच मी. हा, तर नारदमुनी आपण मला आपला स्वाईन फ्लूचा अहवाल तातडीनं सादर करा. आपल्या गणेशाची पृथ्वीवर जाण्याची वेळ जवळ येतेय तत्पूर्वी तेथील परिस्थितीची माहिती मिळाली पाहिजे मला.


लक्ष्मी : ते काही असो पण यंदा गणेशाला पाठविण्याचं धाडस करू नका. त्याला काही झालं तर शंकर पुन्हा तांडव करतील की...


विष्णू : अग गणेश तर विघ्नहर्ता आहे. भारतात त्याची लोक उत्सुकतेनं वाट पाहतायत. तो आल्यामुळं त्यांची सारी विघ्न दूर होतील अशी लोकांची श्रद्धा आहे.


(यावर सर्वांची चर्चा होते. नारद स्वाईन फ्लूची माहिती देतात. स्वर्गात त्याचा काही प्रार्दुभाव होण्याची शक्‍यता कशी नाही, असं पटवून देत असतानाच एक सेवक धावतपळत तिथं येतो. स्वर्ग आणि नरकातली काही मंडळी आजारी आहेत. त्यांना सर्दी झालीय, घसा खवखवतोय आणि तापही येतोय, अशी माहिती तो देतो. सारेजण नारदांकडं पाहतात. नारद कानावर हात ठेवतात. स्वर्गात स्वाईन फ्लू पोहचालाच कसा याची चौकशी सुरू होते. चौकशीअंती कळतं की पृथ्वीवर स्वाईन फ्लूमुळे मृत झालेल्यांपैकी काही स्वर्गात तर काही नरकात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडूनच स्वाईन फ्लू इथवर पोहचला असावा. त्यामुळं स्वर्ग आणि नरकात एकच धावाधाव सुरू झाली. स्वर्गात या रोगावर इलाज करणारे डॉक्‍टर्स नसल्याने यमाला तातडीनं बोलावणं धाडण्यात आलं. पृथ्वीवरून दोन चार डॉक्‍टर्स आजच्या आज घेऊन येण्याचं तातडीनं फर्मान भगवान विष्णूंनी काढलंय...


............ vp

Sunday, August 9, 2009

फक्त पावसाळ्यात ...

पावासाचा तो दिवस काळ्या ढगांची रेलचेल, मेघांचा गडगडाट
आठवते माला ती पिवळ्या फुलातून,
हिरव्या रानातून जाणारी नागमोडी पायवाट
भन्नाट वाऱ्याचा भलताच तोरा
ओले चिंब... कपडे तंग, प्रफुल्लित मन हातात काठी सैर निसर्गाची
दुथडी भरून वाहते सरिता तांबडा रंग पाण्याचा
वाटावा हेवा तिच्या मुक्त वाहण्याचा
माळरानावर गायीचं शेपट्या हलवीत चरनं
गोठ्यातील वासरांच हंबरणं
वाऱ्याचा घोंघावता धावता समाचार
झाड, झुडपे माना हलवून देती प्रतिसाद
हिरव्या रंगाची पृथ्वी ल्याली चादर
तांबड्या नागमोडी वाटांना हिरव्या रानाची झालर
पण... हे फक्त पावसाळ्यात
.................................vp