वाचक

View My Stats

Saturday, February 26, 2011


खेळ मांडला, खेळ मांडला
आज इथं हा खेळ मांडला हो !!

तर मंडळी मी अंडेराव , आपले सहर्ष स्वागत करतो.
( शेजारी उभा असलेला दंडेराव त्याला लाथ मारतो.)
सॉरी सॉरी च्यायला विसरलोच बघा. तर मंडळी हा माझा जोडीदार दंडेराव
आम्ही दोघंही आपलं स्वागत करतो.
मंडळी आमच्या आयुष्याचा मंत्र आहे.
( ढोलकीवर थ्री इडियटस्‌ या गाण्याच्या चालीवर)

'जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल
तो देवाकडे करून बोट
देवाकडं करून बोट भरतोय आम्ही आपलं पोट
या पोटामध्ये आहे सगळा काळा माल
राजकारणी मुजोर झालेत मालामाल
(सगळे गातात) अहो आजी... आल इज वेल
अहो तात्या.... आल इज वेल
रे बाबू.... आल इज वेल...'

( विषयाला सुरूवात होते. )
अंडेराव : आल इज वेल ... वेल म्हणजे काय रं दादा ?
दंडेराव : अरे येड्या वेल म्हणजे चीबडाची वेल नाय... वेल म्हणजे चांगले !
अं - वेल म्हणजी चांगलं मग इथ कुठं काय चांगलं हाय रे गड्या
दं -  अरे देवा नारायणा... वाचवरे
( त्याचवेळी एक पात्र पुढे येते, दारू पिऊन तराट झालेल्या अवस्थेत )
हा बोला कुणी हाक मारली... नारायण दगडफोड्या म्हणतात मला... आपल्याला कुणाची टच करायची  हिंमत नाय ... ( अंडेरावकडे बघत) चल जाऊया डोंगऱ्याकडं, पावशेर देणार काय ?

सूत्रधार (पुढे येतो) : बघा लोक हो ... घरात जेवायला काही नाही... बायको पोरं उपाशी मरतायत आणि याची गाडी दिवसरात्र घेरमध्ये
सूत्रधार : अरे नारायणा दारू म्हणजे तुला काय कोकम सरबत वाटला काय ?
नारायण : ये दारूला सरबत काय म्हणतो येड्या... (सुत्रधाराच्या तोंडाचा वास घेत ) तू पण घेतलीस काय ? अरे दारू म्हणजे 'दो बूँद जिंदगी के" आम्हाला घ्यायलाच लागतात.
सूत्रधार : वर तोंड करून बोलतोस. तुला काय लाज -
नारायण - नाय बा.
तुला काय लज्जा - नाय बा ,
शरम - नाय बा
हाय तरी काय तुला - स्टॅमिना हाय ना ! दोन कॉटर मारतो रोज. एकदम टॅंकर हाय
सूत्रधार - तुझा मुलगा शाळत जातो - व्हय बा
त्याच्या भवितव्याचा काय इचार केलास - नाय बा
बायको - हाय ती जिती हाय
तू काम काय करतोस : काय खणीवर जातो...दगड काढतो. हातावर पैशे घेतो. संध्याकाळी येताना डोंगऱ्याकडं जातो पावशेर मारतो. नि घरी येतो...
(घरातले दृष्य - बायको डोक्‍याला हात लावून चुली जवळ बसलेली असते.)
(नारायण मागे वळून)
नारायण : ये बायकू जेवायला वाढ
बायको : मसण्या जेवायस कुठून वाढू ...दोन दिवसापासून घरात अन्नाचा दाणा नाय...बाब्याची शाळेची फी भरायची राहलीय. जेवान कठून आणू ...दारू पिऊन कशाला येतो तुझ्या दारवेला लागली आग ती..
( नारायण रागाने बायकोच्या अंगावर धावून जातो..)
ये रांन्डे लय थोबाड वाजतय तुझं ... तुझ्या मायची....( तो बायकोला मारायला जातो तेवढ्यात पोरगा मध्ये धावून जातो)
पोरगा : ये बाबा आयेच्या अंगाला हात लावायचा नाय... दोघेही झटापट सुरू होते.) - दृष्य फ्रिज होते.

सूत्रधार - पाहिलात मंडळी 'घर घर की हीच कहाणी हाय'. अहो घरात बायको पोरं उपाशी मरत असली तरी यांना दारू लागते... दिवसभर मेहनत करायची आणि संध्याकाळी मेहनतीचा पैसा डोंगऱ्याकडं दारूत उडवायचा. अहो विशी पंचविशीतली पोरं त्या दारूच्या गुत्यावर आपलं आयुष्य जाळत असतात...दारू आयुष्याचं वाटोळं करते हो वाटोळे सावध व्हा ! जीवन बरबाद करायचं की, स्वतः:चं नाव काढायच. तुम्हीच ठरवा !


दृष्य- 2
खंगलेल्या अवस्थेतला एक तरुण खोकत खोकत पुढे जातो.... एक किंकाळी एकू येते (तो आत्महत्या करतो.)
(तरुण जातो त्या दिशेनं दोघं जण चालत येतात )
1 - खूप चांगला पोरगा होता. पाच वर्षापूर्वी मुंबईत गेला होता. एका कंपनीत कामाला पण होता चांगला.
गावाकडं महिन्याच्या महिना पैसा पाठवीत होता. गेल्या वर्षी आजारी पडला. गावात आला तेव्हा कळलं त्याला एड्‌स झाला होता.
2 - अरे वाईट नादाला लागला असलं...
1 - अरं बाबा एड्‌स काय फक्त वेशेकडे गेल्यानंच होतो असं नाय.
एचआयव्ही बाधित दूषित रक्त अंगात चढवल्यानं, इंजेक्‍शनची एकच सुई सगळ्यांना वापरल्याने असुरक्षित संबंधातून पण हा रोग होतो. आई वडील एचआयव्ही बाधित असतील तर पोटातल्या पोराला पण होऊ शकतो... म्हणून लोकांनी अशा लोकांना समजून घेण गरजेचं हाय.
2- होय खरय गड्या तुझं...या पोराल घरातल्यानी समजून घेतलानी नाय. ते घाबरले त्यांना वाटलं आपल्याला पण एड्‌स होईल म्हणून त्याला अक्षरशः: कोंडून ठेवलं...आणि आता त्यानं आयुष्य संपवलं तर रडतायत.

सूत्रधार : पाहीलंत ही परिस्थिती आज कोणावरही येऊ शकते. तेव्हा प्रत्येकानं काळजी घ्याला हवी. 'नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच आधार". हा रोग संसर्गजन्य नाय. त्यामुळे अशा रुग्णांना पण समाजानं .घरातल्या लोकांनी समजून घ्यायला हवं...त्यांना माणसासरखी वागणूक द्या.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्नापूर्वी पत्रिका नाही बघितली तरी चालेल. पण एचआयव्हीची टेस्ट मात्र करून घ्यायाला विसरू नका. टेस्ट पूर्णपणे सुरक्षित व गुप्त ठेवली जाते. उद्याचा प्रसंग टाळण्यासाठी आजच व्हा सावध !

दृष्य तिसरे
एक जण ओरडतो अरं नळाला पाणी आलं.. मग एकच गलका होतो. सगळे जण हंडा कळश्‍या घेऊन नळाकड्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌धाव घेतात.पाणी भरण्यासाठी प्रत्येकाची गडबड उडते ...ढुसाढुशी सुरू होते. एक जण ओरडतो अरे चार चार हांडे घ्या पण कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. भांड्याला भांडी आपटतात. दोन बायकात भांडण जुंपतं ..शिव्यांची लाखोली एकमेकांना वाहतात...मारामारी होते. बायकांची मारामारी बघून पुरुष ही घुसतात. हाणामारी सुरू होते
(दृष्य फ्रिज )

सूत्रधार : बघा मंडळी हे आपल्या वाडीत वस्तीत रोज दिसणारं चित्र. विहीरीतल, बावडीतलं पाणी आधी बेसुमार उपसायचं आणि उन्हाळा आला की, पाण्यासाठी एकमेकांची डोकी फोडून लालपाणी काढायचं.
गेल्या पावसाळ्यात पुरातल्या पुलावरनं पाणी गेलं. पाहिजे तर त्या मदनला विचारून बघा.
बोंडगीची दगड बुडाली येवढा हौर गेला. आणि आता प्यायला पाणी नाही.
ंडळी हे किती वर्ष असं चालायचं. पावसाचं वाहून जाणारं पाणी बंधारे बांधून, शेततळी बांधून आपण कधी अडवणार. बेसुमार झाडं तोडल्यानं जमिनीची धूप होते. नदी नाले गाळाने भरले आहेत. लोकहो पाणी आडवा... पाणी जिरवा...गाव वाचवा..

(दृष्य चौथे )
एसटी स्टॉपवर एक तरुण एसटीतून उतरतो. त्याच्या हातात सुटकेस असते. ) दोघे जण उत्सुकतेने त्याच्याकडे जातात.
1 - अरे पांडबाचा इलास ना तू ? मुंबैत असतोस ना ?
विलास : होय ! पण आता मी गावात आलोय कायचा राहायला.
2 - का तुला बी काय आजार झाला काय ?
विलास : तसलं काही नाही. मुंबईत चार पाच हजाराची नोकरी करण्या पेक्षा. गावातील तरुणांना एकत्रित करून शेती किंवा एखादा लघू उद्योग करायचं ठरवलं आहे मी. गावातल्या पोरांनाबी काम मिळेल. सहकार रूजला पायजे बघा आपल्याकडं. 'एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ'
सूत्रधार : (आनंदाने) नारायणा... नारायणा
लगेचच (पहिल्या दृष्यातील नारायणाचे पात्र) हो आलो... आलोच. मीच तो नारायण. ओळखलंत नाय अहो पयल्या भागात भेटलो नव्हतो का आपण. तेव्हा मी घेरमध्ये होतो. आता मी पीत नाही. दारू सोडली अजिबात..घरात येळच्या येळी पैसा देतो. बाब्याच्या शाळंची फी, भरलीय, बचत करतो. बायको पण खूष संसार कसा झाकास चाललाय माझा.
(तिथून एक तरूण जात असतो.)
सूत्रधार : अरे गणपत कूठ निघालास ?
गणपत : लांज्याला जाऊन येतो सरकारी रुग्णालयात. एचआयव्ही ची टेस्ट करून येतो. महिनाभरानं लग्न ठरवायचं आहे. त्याच्या आधी टेस्ट करून घेतो. नंतर वांद नको.
(काही गावकरी खांद्यावर कुदळ फावडी घेऊन निघालेली असतात सूत्रधार त्यांना हाक मारतो)
गावकऱ्यांनो कुठं निघालात कुदळ फावडी घेऊन.
1 - आम्ही बंधारा बांधायला जातोय. यावर्षी पावसाचं पाणी अडवायचं ...जमिनीत जिरवायचं असा आम्ही निर्धार केला आहे.
2 व 3 - व्हय आम्हाला आता टॅंकर मुक्त गाव करायचं आहे.झाडं लावणार .गाव हिरवागार करणार.

सुत्रधार: तर मंडळी आमचं गाव आता सुधारतं आहे. आम्हाला खूप खूप आनंद वाटला . आता आम्हाला निरोप घ्यायला हवा मंडळी.

(सारे एकत्रित गाऊ लागतात)

वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी...

.........................

No comments: