वाचक

View My Stats

Saturday, February 26, 2011


खेळ मांडला, खेळ मांडला
आज इथं हा खेळ मांडला हो !!

तर मंडळी मी अंडेराव , आपले सहर्ष स्वागत करतो.
( शेजारी उभा असलेला दंडेराव त्याला लाथ मारतो.)
सॉरी सॉरी च्यायला विसरलोच बघा. तर मंडळी हा माझा जोडीदार दंडेराव
आम्ही दोघंही आपलं स्वागत करतो.
मंडळी आमच्या आयुष्याचा मंत्र आहे.
( ढोलकीवर थ्री इडियटस्‌ या गाण्याच्या चालीवर)

'जब लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल
तो देवाकडे करून बोट
देवाकडं करून बोट भरतोय आम्ही आपलं पोट
या पोटामध्ये आहे सगळा काळा माल
राजकारणी मुजोर झालेत मालामाल
(सगळे गातात) अहो आजी... आल इज वेल
अहो तात्या.... आल इज वेल
रे बाबू.... आल इज वेल...'

( विषयाला सुरूवात होते. )
अंडेराव : आल इज वेल ... वेल म्हणजे काय रं दादा ?
दंडेराव : अरे येड्या वेल म्हणजे चीबडाची वेल नाय... वेल म्हणजे चांगले !
अं - वेल म्हणजी चांगलं मग इथ कुठं काय चांगलं हाय रे गड्या
दं -  अरे देवा नारायणा... वाचवरे
( त्याचवेळी एक पात्र पुढे येते, दारू पिऊन तराट झालेल्या अवस्थेत )
हा बोला कुणी हाक मारली... नारायण दगडफोड्या म्हणतात मला... आपल्याला कुणाची टच करायची  हिंमत नाय ... ( अंडेरावकडे बघत) चल जाऊया डोंगऱ्याकडं, पावशेर देणार काय ?

सूत्रधार (पुढे येतो) : बघा लोक हो ... घरात जेवायला काही नाही... बायको पोरं उपाशी मरतायत आणि याची गाडी दिवसरात्र घेरमध्ये
सूत्रधार : अरे नारायणा दारू म्हणजे तुला काय कोकम सरबत वाटला काय ?
नारायण : ये दारूला सरबत काय म्हणतो येड्या... (सुत्रधाराच्या तोंडाचा वास घेत ) तू पण घेतलीस काय ? अरे दारू म्हणजे 'दो बूँद जिंदगी के" आम्हाला घ्यायलाच लागतात.
सूत्रधार : वर तोंड करून बोलतोस. तुला काय लाज -
नारायण - नाय बा.
तुला काय लज्जा - नाय बा ,
शरम - नाय बा
हाय तरी काय तुला - स्टॅमिना हाय ना ! दोन कॉटर मारतो रोज. एकदम टॅंकर हाय
सूत्रधार - तुझा मुलगा शाळत जातो - व्हय बा
त्याच्या भवितव्याचा काय इचार केलास - नाय बा
बायको - हाय ती जिती हाय
तू काम काय करतोस : काय खणीवर जातो...दगड काढतो. हातावर पैशे घेतो. संध्याकाळी येताना डोंगऱ्याकडं जातो पावशेर मारतो. नि घरी येतो...
(घरातले दृष्य - बायको डोक्‍याला हात लावून चुली जवळ बसलेली असते.)
(नारायण मागे वळून)
नारायण : ये बायकू जेवायला वाढ
बायको : मसण्या जेवायस कुठून वाढू ...दोन दिवसापासून घरात अन्नाचा दाणा नाय...बाब्याची शाळेची फी भरायची राहलीय. जेवान कठून आणू ...दारू पिऊन कशाला येतो तुझ्या दारवेला लागली आग ती..
( नारायण रागाने बायकोच्या अंगावर धावून जातो..)
ये रांन्डे लय थोबाड वाजतय तुझं ... तुझ्या मायची....( तो बायकोला मारायला जातो तेवढ्यात पोरगा मध्ये धावून जातो)
पोरगा : ये बाबा आयेच्या अंगाला हात लावायचा नाय... दोघेही झटापट सुरू होते.) - दृष्य फ्रिज होते.

सूत्रधार - पाहिलात मंडळी 'घर घर की हीच कहाणी हाय'. अहो घरात बायको पोरं उपाशी मरत असली तरी यांना दारू लागते... दिवसभर मेहनत करायची आणि संध्याकाळी मेहनतीचा पैसा डोंगऱ्याकडं दारूत उडवायचा. अहो विशी पंचविशीतली पोरं त्या दारूच्या गुत्यावर आपलं आयुष्य जाळत असतात...दारू आयुष्याचं वाटोळं करते हो वाटोळे सावध व्हा ! जीवन बरबाद करायचं की, स्वतः:चं नाव काढायच. तुम्हीच ठरवा !


दृष्य- 2
खंगलेल्या अवस्थेतला एक तरुण खोकत खोकत पुढे जातो.... एक किंकाळी एकू येते (तो आत्महत्या करतो.)
(तरुण जातो त्या दिशेनं दोघं जण चालत येतात )
1 - खूप चांगला पोरगा होता. पाच वर्षापूर्वी मुंबईत गेला होता. एका कंपनीत कामाला पण होता चांगला.
गावाकडं महिन्याच्या महिना पैसा पाठवीत होता. गेल्या वर्षी आजारी पडला. गावात आला तेव्हा कळलं त्याला एड्‌स झाला होता.
2 - अरे वाईट नादाला लागला असलं...
1 - अरं बाबा एड्‌स काय फक्त वेशेकडे गेल्यानंच होतो असं नाय.
एचआयव्ही बाधित दूषित रक्त अंगात चढवल्यानं, इंजेक्‍शनची एकच सुई सगळ्यांना वापरल्याने असुरक्षित संबंधातून पण हा रोग होतो. आई वडील एचआयव्ही बाधित असतील तर पोटातल्या पोराला पण होऊ शकतो... म्हणून लोकांनी अशा लोकांना समजून घेण गरजेचं हाय.
2- होय खरय गड्या तुझं...या पोराल घरातल्यानी समजून घेतलानी नाय. ते घाबरले त्यांना वाटलं आपल्याला पण एड्‌स होईल म्हणून त्याला अक्षरशः: कोंडून ठेवलं...आणि आता त्यानं आयुष्य संपवलं तर रडतायत.

सूत्रधार : पाहीलंत ही परिस्थिती आज कोणावरही येऊ शकते. तेव्हा प्रत्येकानं काळजी घ्याला हवी. 'नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच आधार". हा रोग संसर्गजन्य नाय. त्यामुळे अशा रुग्णांना पण समाजानं .घरातल्या लोकांनी समजून घ्यायला हवं...त्यांना माणसासरखी वागणूक द्या.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लग्नापूर्वी पत्रिका नाही बघितली तरी चालेल. पण एचआयव्हीची टेस्ट मात्र करून घ्यायाला विसरू नका. टेस्ट पूर्णपणे सुरक्षित व गुप्त ठेवली जाते. उद्याचा प्रसंग टाळण्यासाठी आजच व्हा सावध !

दृष्य तिसरे
एक जण ओरडतो अरं नळाला पाणी आलं.. मग एकच गलका होतो. सगळे जण हंडा कळश्‍या घेऊन नळाकड्‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌धाव घेतात.पाणी भरण्यासाठी प्रत्येकाची गडबड उडते ...ढुसाढुशी सुरू होते. एक जण ओरडतो अरे चार चार हांडे घ्या पण कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसते. भांड्याला भांडी आपटतात. दोन बायकात भांडण जुंपतं ..शिव्यांची लाखोली एकमेकांना वाहतात...मारामारी होते. बायकांची मारामारी बघून पुरुष ही घुसतात. हाणामारी सुरू होते
(दृष्य फ्रिज )

सूत्रधार : बघा मंडळी हे आपल्या वाडीत वस्तीत रोज दिसणारं चित्र. विहीरीतल, बावडीतलं पाणी आधी बेसुमार उपसायचं आणि उन्हाळा आला की, पाण्यासाठी एकमेकांची डोकी फोडून लालपाणी काढायचं.
गेल्या पावसाळ्यात पुरातल्या पुलावरनं पाणी गेलं. पाहिजे तर त्या मदनला विचारून बघा.
बोंडगीची दगड बुडाली येवढा हौर गेला. आणि आता प्यायला पाणी नाही.
ंडळी हे किती वर्ष असं चालायचं. पावसाचं वाहून जाणारं पाणी बंधारे बांधून, शेततळी बांधून आपण कधी अडवणार. बेसुमार झाडं तोडल्यानं जमिनीची धूप होते. नदी नाले गाळाने भरले आहेत. लोकहो पाणी आडवा... पाणी जिरवा...गाव वाचवा..

(दृष्य चौथे )
एसटी स्टॉपवर एक तरुण एसटीतून उतरतो. त्याच्या हातात सुटकेस असते. ) दोघे जण उत्सुकतेने त्याच्याकडे जातात.
1 - अरे पांडबाचा इलास ना तू ? मुंबैत असतोस ना ?
विलास : होय ! पण आता मी गावात आलोय कायचा राहायला.
2 - का तुला बी काय आजार झाला काय ?
विलास : तसलं काही नाही. मुंबईत चार पाच हजाराची नोकरी करण्या पेक्षा. गावातील तरुणांना एकत्रित करून शेती किंवा एखादा लघू उद्योग करायचं ठरवलं आहे मी. गावातल्या पोरांनाबी काम मिळेल. सहकार रूजला पायजे बघा आपल्याकडं. 'एक मेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ'
सूत्रधार : (आनंदाने) नारायणा... नारायणा
लगेचच (पहिल्या दृष्यातील नारायणाचे पात्र) हो आलो... आलोच. मीच तो नारायण. ओळखलंत नाय अहो पयल्या भागात भेटलो नव्हतो का आपण. तेव्हा मी घेरमध्ये होतो. आता मी पीत नाही. दारू सोडली अजिबात..घरात येळच्या येळी पैसा देतो. बाब्याच्या शाळंची फी, भरलीय, बचत करतो. बायको पण खूष संसार कसा झाकास चाललाय माझा.
(तिथून एक तरूण जात असतो.)
सूत्रधार : अरे गणपत कूठ निघालास ?
गणपत : लांज्याला जाऊन येतो सरकारी रुग्णालयात. एचआयव्ही ची टेस्ट करून येतो. महिनाभरानं लग्न ठरवायचं आहे. त्याच्या आधी टेस्ट करून घेतो. नंतर वांद नको.
(काही गावकरी खांद्यावर कुदळ फावडी घेऊन निघालेली असतात सूत्रधार त्यांना हाक मारतो)
गावकऱ्यांनो कुठं निघालात कुदळ फावडी घेऊन.
1 - आम्ही बंधारा बांधायला जातोय. यावर्षी पावसाचं पाणी अडवायचं ...जमिनीत जिरवायचं असा आम्ही निर्धार केला आहे.
2 व 3 - व्हय आम्हाला आता टॅंकर मुक्त गाव करायचं आहे.झाडं लावणार .गाव हिरवागार करणार.

सुत्रधार: तर मंडळी आमचं गाव आता सुधारतं आहे. आम्हाला खूप खूप आनंद वाटला . आता आम्हाला निरोप घ्यायला हवा मंडळी.

(सारे एकत्रित गाऊ लागतात)

वाडी वरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी...

.........................

Wednesday, June 30, 2010

अचानक आलेल्या ढगांसारखी बरसलीस


आणि विसरलीस...

 
मी मात्र  जमिनीत गाडलेल्या झाडासारखा 
 
 
 अजूनही वाट पाहतोय बरसातीची...

Sunday, June 27, 2010

पाऊस

पाऊस... पाऊस धुवाधार...

पाऊस... पाऊस हिरवा गार...

पाऊस... पाऊस ओलाशार...

पाऊस... पाऊस बहार...

पाऊस... पाऊस कहर...

पाऊस... पाऊस लहर...

Thursday, April 22, 2010

जय नारायण म्हणा !!

जय नारायण म्हणा !!

ओळखलंत का मतदार हो मला
पोटनिवडणुकीत आला कोणी थिजलेला
कपडे होते पांढरे शुभ्र
डोक्‍यावरती गांधी टोपी

क्षणभर बसला नंतर हसला
बोलला वरती पाहून
शिवसेनेत बंडाळी माजली
गेले पद वाहून

भरल्या हाती धाडतील कसा
राजीनामा देऊन बसलो
कॉंग्रेसला घेऊनसंगे लढतो आहे
ंमतदारांना साकडे घालतो आहे

खिशामध्ये हात घालीत
हसत हसत उठला
चहा नको मतदार हो माला
जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला सेनेतला संसार
तरी मोडला नाही कणा
मतदान यंत्रावरील दुसरे बटन दाबून
फक्त जय नारायण म्हणा !

( विडंबन )

...............

Tuesday, March 30, 2010

'ऑल इज वेल "

ंमुंबईतील मराठमोळी वस्ती. लाऊड स्पीकरवर हिंदी सिनेमातील नव्या हीट गाण्यांसह मराठीची कोंबडी पळाली आणि आयचा घो येडा झाला काय रे अशी रापचीक मालाची गाणी वाजत असतात. अधूनमधून श्री प्रभुरामचंद्रांची महती सांगणारी गाणी देखील सुरू आहेत. येथूनच निघालेल्या विष्णू आणि नारदाच्या कानावर ही गाणी पडतात. त्यामुळे विष्णूचे कुतूहल जागृत होते. ते नारदाला विचारतात.

विष्णू : गवरी, गणपती, शिमगा सगळे झाले. आता हा आणि कसला उत्सव आहे.

नारद : देवा असे काय करता. आज प्रभू रामचंद्र नाही का जन्माला येणार ?

विष्णू : अरे हो. लक्षातच नाही राहिलं माझ्या. पण ही रापचीक माल है सारखी गाणी कशाला इथं ?

नारद : देवा तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. आपल्या गणेशासह प्रभू राम ते अगदी रामभक्त हनूमानालाही या सारख्या गाण्यांची सवय झालीय. दरवर्षी ते पृथ्वीवर येतात. त्यांना माहीत आहे सगळं

विष्णू : असो, चल आपणही राम जम्मोत्सवात सहभागी होऊ या

नारद : चला तर मग
(दोघेही राम जन्म पाहायला थांबतात. दुपारचे बारा वाजतात. राम जन्माला येतो, 'राम जन्मला ग बाई राम' अशी हाकाटी होते. मात्र यावेळी थोडं विपरीत घडलं दरवर्षी हासणार राम यावेळी मात्र हसला नाही. त्यामुळे सारेच चिंतेत पडले.)

विष्णू : रामाच्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता का? तो हसतही नाही.
( सगळे भक्त रामला हसवण्यासाठी प्रयत्न सुरू करता. कोणी खेळणी आणतो, कोणी धन्युष्य बाण हातात देतो, पण काही उपयोग होत नाही.)

नारद : देवा मला वाटतं प्रभूरामचंद्राचं काही तरी बिनलं असणार. पृथ्वीवर रामराज्य आणण्याची भाषा केली जाते. पण येथे महागाई, बेकारी, दहशतवाद, दारीद्रयाने जनतेचा जीव मेटाकुटीला आला आहे. सर्वसामान्यांना जगणे मुश्‍कील झाले आहे.

विष्णू : हो खरय तुझं राम राज्य म्हणजे सुरक्षा, सुबत्ता, स्थैर्य यांचा मिलाफ असतो. पण रामाला आपल्या खऱ्या राज्यात दहा तोंडाच्या रावणाला मारणं शक्‍य झालं. मात्र आता सर्व सामान्यांसमोर उभ्या राहिलेल्या समस्या रुपी रावणाला कसं मारायचं याची चिंता पडली असणार. लोकांच्या अपेक्षेला आपण उतरलो नाही तर आपणावरही कोणी विश्‍वास ठेवणार नाही असे त्याला वाटतयं

(विष्णू मनाशी निर्धार करतात आणि रामाच्या कानाशी जाऊन पुटपुटतात 'ऑल इज वेल" आणि रामाच्या चेहऱ्यावर हास्य पसरतं.)
..............

Saturday, February 6, 2010

राहुल आला-







बया बया माझ्या मुंबैत
आज राहुल आला
राहुल कसा म्हणू
युवराज तो कांग्रेसचा

रस्त्यांना फुटले पाय
झोपड्या, चाळी घेई धाव
घारीपरी हेलिकाप्टर त्येचे
घेई "पवनहंस'चा ठाव

मुख्यमंत्री वराडला
म्हणा झिंदाबाद म्हणा
देवापरी आला दिल्लीतून
आला आपला कांग्रेसचा राणा

पोलिसांच्या हाती दंडुके
नेत्यांच्या हाती हार
मंत्री चपला उचलून
त्येचा हलका करी भार

हेलीकाप्टरातला युवराज
चालू लागे झराझरा
बया बया रूप त्येचं
जसा पौर्णिमेचा चंद्र खरा

थवा जाई रमाबाईनगरात
म्होरं गांधी टोपीवाले
मागे करवादती शिवसैनिक
थोर नेते खादीतले

कुठे व्हाती उघडी गटारं
कुठं चिखलाचा सडा
युवराज हिमतीचा
उड्या मारी तडातडा

वाटेवर रेटारेटी
गर्दी झाली येडीपीशी
युवराजा न्याहाळत वस्ती
काही बोले मंत्र्यापाशी

कुठे बॅंकेत घुसे
पुसे कसं काय ?
मॅनेजर विस्फारी डोळे
खाली लटलटे पाय

कुठे लोकलमध्ये शिरे
म्हणे प्रवाशास आत
कैसा चाले ? प्रवाशाचे
जाती घशामंदी दात

घोळका आला मैदानावर
युवराज बोले जनतेशी
त्याची दिल्लीवाली भाषा
त्यासनी कळल कशी

अशा डौलडांगोऱ्यात
त्येची झाली मुंबैय फेरी
असा नवरा देरे देवा
म्हणती कालेजच्या मॉड पोरी

राहुल आला राहुल गेला
पुन्हा हेलीकाप्टर उडे
समदे मुंबैकर चक्रावून
बघतात आकाशाकडे

....................
( मुळ कविता 'राजा आला' कवी कुसुमाग्रज यांची )

Friday, January 29, 2010

मोबाईल वेड !

पृथ्वी भ्रमणावर आलेले विष्णू आणि नारद दोघेही चालू लागतात. विष्णू आज काहीसे अस्वस्थ आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीचे भाव नारदाच्या नजरेतून सुटले नाहीत. "देवा काय झाले तुमची चर्या उतरलेली का ?', अशी चौकशी नारदाने एकदा करून पाहिली. पण त्यात यश काही आले नाही. भगवंताचे नक्की काय बिनसले असेल. मुंबईतले हे हेक्‍टीक लाइफ बघून उबग आली तर नाही ना ? तेवढ्यात एक मुलगी समोरून येताना दिसते. मान थोडीशी खाली करून हातवारे करीत हळू आवाजात बोलत बोलत त्यांच्या बाजूने निघून जाते. तिची काही निसटती वाक्‍ये दोघांच्या कानावर पडतं. " यु लव मी ना ! मग आपण आज भेटायचे नक्की. तू आला नाहीस तर बग मी तुझ्याशी कधी कधी म्हणजे कधीच बोलणार नाही' तेवढ्यात एक वेगवान गाडी तिच्या अगदी जवळून जोराने हॉर्न वाजवून निघून जाते. ती पुन्हा भानावर येते व बोलत बोलत चालू लागते. दोघेही तिच्याकडे आश्‍चर्याने पाहतात.


सुटाबुटातला एक गृहस्थ हातवारे करीत रागा रागाने बोलत होता. त्यांच्या चेहऱ्यावर संताप होता. बोलता बोलता त्याची समोरून येणाऱ्याशी धडक लागली. त्याने दोन शिव्या हासडल्या. कट्यावर बसलेला एक तरुण एकटाच खोखो हसत होता. त्याचे वेडेवाकडे हातवारे सुरू होते.एक सधू देखील साक्षात देवाशी संवाद साधत असल्याच्या आविर्भावात जाता दिसला.

विष्णू : नारदा हा काय प्रकार आहे ? या मर्त्य मानवाला झालेय तरी काय. मी इथे आल्यापासून पाहतो. चालताना, गाडी चालवताना सर्वत्र लोक असे वेड लागल्यागत का वागतायत.

नारद : देवा मानवाने एक असे यंत्र शोधून काढले आहे की त्याला आपल्यापासून हजारो योजने दूर असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधता येतो. अगदी झटपट. भक्ती पंथाला लागलेले साधू संन्याशांनाही या यंत्राचा मोह आवरला नाही. मेनके पेक्षा भारी आहे हे यंत्र.

विष्णू : म्हणजे ती व्यक्त आपल्या समोर नसतानाही आपल्याला तिचा आवाज येऊ शकतो.

नारद : हो देवा बरोबर. त्या वस्तूला भ्रमणध्वनी असे म्हणतात.

विष्णू : अरे पण मला तर त्यांच्या हातात असले कोणते यंत्र दिसले नाही बुवा

नारद : देवा त्यांच्या कानात तुम्हाला काही तरी दिले ना. त्याला "इयरफोन' म्हणतात. म्हणजे ते त्या भ्रमणध्वनीशी जोडलेले असतात. त्यामुळे हात मोकळे ठेवून बोलता बोलता इतर कामेही करता येतात.

विष्णू : सुंदर अति सुंदर ! या मानवाच्या बुद्धीची तारीफ करावी तेवढी कमी. पण नारदा मला एक धोका जाणवतो. भ्रमणध्वनीवर असे कुठेही आणि कसले भान न बाळगता बोलणे धोकादायक आहे. अशा ने अपघात होऊ शकतो. असे लोक अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. तेव्हा या चांगल्या गोष्टीचा योग्य आणि काळजीपूर्वक वापर करावयास हवा.

(तेवढ्यात मोबाईलचे एक दुकान दिसते.विष्णूची पावले दुकानाकडे वळतात. दोघेही तीन मोबाईल खरेदी करून बाहेर येतात. तेव्हा विष्णूचा चेहरा खुललेला असतो. नारदाला देवाच्या नाराजीचं कारण आता उमगतं लक्ष्मीच्या आठवणीनं व्याकूळ झाले विष्णू लक्ष्मीला कॉल करतात.)