वाचक

View My Stats

Saturday, June 11, 2011

निसर्गाच्या कुशीतला इतिहास


स्वराज्यावर चाल करून येणाऱ्या गनिमाच्या उरात त्याने एकेकाळी धडकी भरवली. श्रीमान योगी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने तो पावन झाला अन्‌ मराठी मुलखाची राजधानी म्हणून मिरवला. शिवछत्रपतींच्या झंझावाती युगाचा एक साक्षीदार म्हणून रायगडची ओळख. दुसरं काश्‍मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य कोकणच्या कुशीत वसलेल्या या गडाला इतिहासाबरोबर निसर्गाचंही लेणं लाभलं. निसर्गानं सौंदर्याची त्याच्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. निसर्गाच्या आभूषणांनी नटलेला ओला, हिरवा रायगड सध्या पर्यटक आणि गिर्यारोहकांना साद घालतो आहे.पावसाचा मनमुराद आनंद घेत, त्या शनिवारी आम्ही मित्रांनी रायगडाकडे कूच केली. भल्या पहाटे साडेचार वाजता आम्ही पाचाड खिंड ओलांडून रायगडाच्या पायथ्याशी चित्त दरवाजाजवळ पोचलो. वाटेत निसर्गसौंदर्याचा अद्वितीय नजारा... धरतीचा निरोप घेणारी रात्र जागोजागी धुक्‍यात रेंगाळत होती. त्या अस्पष्ट उजेडातून हळूहळू डांबरी सडक स्पष्ट होत होती. सडकेलगत झाडावरील पानांच्या शेंड्यांतून, सुकलेल्या काटक्‍यांच्या टोकातून निथळणारं दव. दवाच्या थेंबांतून आरपार जाणाऱ्या सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे दवाचे मोती बनले. निसर्गाचा हा अचंबित करणारा चमत्कार पाहून रात्रभर प्रवासानं आलेला थकवा कुठल्या कुठे पळाला. आम्ही एकदम फ्रेश झालो. रायगडापासून 22 किलोमीटरवर निसर्गानं आमचं असं जबरदस्त स्वागत केलं. वाटेत लागणाऱ्या खेडेगावांचा, लाल कौलारू घरांचा निरोप घेत जसजसे आम्ही रायगडाकडे जाऊ लागलो, तसतशी ती घरं लहान होत गेली. मध्येच येणाऱ्या धुक्‍याच्या लाटांनी ती कधी कधी पूर्णपणे अदृश्‍य होत. आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो, तेव्हा तर धुकं आणि छत्रपतींच्या रक्षणासाठी छातीचा कोट करणाऱ्या सह्य पर्वताच्या काळ्या पाषाणांचा लपंडाव सुरू होता. धुक्‍याचं पांघरूण झुगारून काही डोंगरमाथे आळोखेपिळोखे देत "उठतो' म्हणत. पण पाच मिनिटं हं.. असं लहान मुलासारखं म्हणून पुन्हा धुक्‍याच्या चादरीत तोंड खुपसून मुरी मारून झोपत. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि डोंगरांना जागो... जागो म्हणत झंझावाती समाचार घेणारे वासुदेवाच्या भूमिकेतले धुक्‍याचे लोळ, सारंच नयनरम्य. शब्दबद्ध न होणारं. धुक्‍याचा हा ढग असा काही बेभानपणे सैर करीत होता, की बघता बघता तो डोक्‍यावरून निघून जात होता आणि मग लक्षात येत होतं, अरे, आपल्या केसांवर, कपड्यांवर दव सांडलंय अन्‌ फुटावरच्या अंतरावरचंही काही दिसत नाहीय. काही क्षणांपूर्वी स्पष्ट दिसणारी कौलारू घरं आणि डोंगरांचे शेंडे धुक्‍यात हरवून जात.
अफझलखानाच्या स्वारीपूर्वी इ.स. 17 व्या शतकात शिवरायांनी रायरीचा किल्ला यशवंतराव मोरे यांच्याकडून जिंकून घेतला. किल्ल्याचं बांधकाम मोरोपंत पिंगळे यांनी केलं. दोन हजार 700 फूट उंचीवर काळ्या कातळांचा हा किल्ला वसला आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी राजधानी म्हणून हा किल्ला छत्रपतींनी चाणाक्षपणे हेरला. "दीड गाव उंच - देवगिरीहून दशगिरीहून दशगुणी उंच जागा, पर्ज्यन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही हे पाहून महाराज म्हणाले, "तख्तास जागा हाच गड करावा' असा बखरीत उल्लेख सापडतो. गडावर चढाई करताना रायगडच्या या वैशिष्ट्यांचा प्रत्यय पावलोपावली येतो. पावसामुळे निसरड्या झालेल्या पायवाटेनं गड चढावा लागतो. डोंगराच्या भल्यामोठ्या कातळी पोटावरून कोसळणारे स्वच्छ, निर्मळ पाण्याचे धबधबे वाटेत भेटतात; तर कुठे कातळाला पाझर फुटून नुसतंच पाणी ठिबकत असतं. वाटेतच धुक्‍याच्या ढगाआडून पाऊस अचानक चाल करून येतो, तेव्हा चांगलीच गाळण उडते. समोरचा रस्ता दिसेनासा होतो. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. वाऱ्याच्या झंझावाताने तोल जाऊन शेकडो फूट दरीत कोसळण्याची भीती असते.गडावर पोचलं, की दृष्टीस पडतो हिरवाकंच शालू नसलेली तांबडी माती आणि नागमोडी पायवाट, काळ्या दगडांनी केलेलं बांधकाम. "अदभुत!' असेच शब्द मुखातून बाहेर पडतात. "खूब लढा बुरूज', "दोन- नाणे' (नाना) दरवाजा, गंगासागर, टकमक टोक, नगारखाना, राण्यांचे महाल, अष्टप्रधान मंडळाची जागा, राजदरबारातील उठबस असणाऱ्या व्यक्तींसाठी असलेला "मीना दरवाजा', महादरवाजा, जगदीश्‍वराचं मंदिर हे सारं पाहिलं, की शिवकालीन देदीप्यमान इतिहासाची पानं डोळ्यांसमोरून झपाझप उलटतात. भोवळ आणणारा हिरकणी कडा पाहिला, की त्या माऊलीच्या धाडसानं मन थक्क होतं. महाराजांचा दरबार आणि त्यांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा पाहिला, की छत्रपतींच्या राज्याभिषेकाचा ऐतिहासिक सोहळा कल्पनेनं नजरेसमोर उभा राहतो अन्‌ ऊर अभिमानानं भरून येतो. गडावर फिरताना पावलोपावली भग्न अवशेषांना, दगडांनाही शब्द फुटतात अन्‌ ते शिवरायांची विजयगाथा सांगतात. इतिहास बोलका होतो. शिवराय आज नसले तरी त्यांचं स्थान एकविसाव्या शतकातही प्रत्येकाच्या हदयात कोरलेलं आहे. म्हणूनच अजूनही ऊन-पावसातही मराठी मनं रायगडाची वाट तुडवीतच असतात...
- योगेश पवार

No comments: