वाचक

View My Stats

Saturday, June 11, 2011

घरी नेऊन पार्क कर

रेल्वेच्या डब्यात किंवा बसमध्ये खिडकीजवळची जागा पटकाविण्यासाठी प्रवाशांमध्ये नेहमीच चढाओढ लागते. जागा अडविण्याच्या स्पर्धेत मग भांडणेही जुंपतात. परवाचीच घटना सीएसटीहून अंबरनाथला जाणाऱ्या रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी नसतानाही झुंबड उडाली (सवयीप्रमाणे). एका प्रवाशाने गाडी प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर खिडकीतून रुमाल टाकून जागा अडवून ठेवली, मात्र गाडीत चढल्यावर दुसऱ्याच प्रवाशाने ती जागा पटकाविली. त्यामुळे दोघेही त्या जागेवर आपला दावा सांगू लागले. मग दोघांत जोरदार बाचाबाची सुरू झाली, हमरीतुमरीवरून प्रकरण गुद्द्यावर आले. दोघेही एकमेकांच्या आई-बहिणींचा उद्धार करीत मनसोक्त शिव्या हासडीत होते. गाडीतील सारे प्रवासी त्यांचा हा "तमाशा' गंभीरपणे पाहत होते. आता एकमेकांची डोकी फुटणारच, असे वाटत असताना काही प्रवाशांनी मध्यस्थी करून दोघांना शांत केले, मात्र तरीही त्यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच होते. "तुझ्या बापाची गाडी आहे काय? गाडी विकत घेतलीय काय तुझ्या बापाने...?' असे त्यातील एकाने सुनावले. त्यावर चवताळलेल्या दुसऱ्याने त्याला तत्काळ प्रत्युत्तर दिलं. "अरे जारे... माझ्या बापाची गाडी नाही, पण तुझ्या बापाने खरेदी केली असेल, तर घरी नेऊन पार्क कर जा,' असे म्हणताच येवढा वेळ दोघांचे भांडण गांभीर्याने पाहणाऱ्या प्रवाशांच्या हास्याचा बांध फुटला आणि सारे खो-खो हसू लागलं. गाडीतील वातावरण क्षणार्धात बदललं. त्यामुळे खजील झालेल्या एका भांडखोराने पुढच्या स्टेशनला गाडी सोडली की हो...
- योगेश पवार

No comments: